श्री गजानन महाराजांची लोकमान्य टिळकांवर कृपा
टिळक बाळ गंगाधर | महाराष्ट्राचा कोहिनूर | दूरदृष्टीचा सागर | राजकारण प्रवीण जो ।।१०।।
निज स्वातंत्र्यासाठी । ज्याने केल्या खटपटी । ज्याची धडाडी असे मोठी । काय वर्णन तिचे करू ? ।।११।।
करारी भीष्मा समान। आर्य महिचे पाहून दैन्य ।सतीचे झाला घेता वाण । भीड न सत्यात कोणाची ।।१२।।
वाक्चातुर्य जयाचे । बृहस्पतीच्या समान साचे । धाबे दणाणे इंग्रजांचे । पाहून ज्याच्या लेखाला ।।१३।।
कृती करून मिळविली । ज्याने लोकमान्य ही पदवी भली । ती न त्यांना कोणी दिली । ऐसा होता बहादर ।।१४।।
- श्री गजानन विजय, अध्याय १५
जगद्गुरु शंकराचार्य यांनी यापूर्वी सनातनधर्माबद्दल समाजात जागृती निर्माण केली. ज्ञानेश्वरांनी तेराव्या शतकात ज्ञानेश्वरी लिहून ते काम समाजाभिमुख केले. त्यानंतर आधुनिक काळात लोकमान्य टिळकांनी गीतारहस्य लिहून समाजात पुन्हा जागृती आणण्याचे काम केले. लोकमान्य टिळकांनी भारतीय समाज जागृतीसाठी आणि भारतीय स्वातंत्र्यासाठी अत्युच्च कोटी चे काम केलेले आहे.
श्रीमंत दादासाहेब खापर्डे हे लोकमान्य टिळकांचे अत्यंत जवळचे अनुयायी होते. यांचे विदर्भांतील आणि देशातील सामाजिक व राजनैतिक कार्य फार मोठे आहे. लोकमान्य टिळकांची सभा अकोल्यास छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्य व्हावयाची होती. या सभेला वर्हाडचे संत श्री गजानन महाराज यांना बोलाविले पाहिजे असे सर्वांचे मत पडले.
अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीले । स्वयंसेवक तयार झाले । तई कईकांचे म्हणणे पडले । अशा रीती विबुध हो ।।२५।।
या शिवजयंती उत्सवाला । आणा शेगांवचे महाराजाला । श्री स्वामी समर्थ गजाननाला । म्हणजे दुधात साखर पडेल की ।।२६।।
शिवाजीच्या राष्ट्रोद्धारा । आशीर्वाद होता खरा । समर्थांचा साजिरा । म्हणून तडीस गेला तो ।।२७।।
टिळकांचे राजकारण । हेच जिजाई हृदय रत्न । त्याला पाहिजे आशिर्वचन । समर्थांचे विबुध हो ।।२८।।
- श्री गजानन विजय, अध्याय १५
बऱ्याच लोकांना हे पटले, काहींना नाही पटले. दादासाहेब खापर्डे श्री संत गजानन महाराजांकडे गेले आणि श्री गजानन महाराजांना लोकमान्य टिळकांच्या सभेत प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रण दिले. श्री गजानन महाराजांनी आमंत्रण स्वीकारले व सभा नीट पार पडेल असे वचन दिले.
सभा नीट पार पडली पण काही दिवसांनी लोकमान्य टिळकांना कलम १२४ (सरकार विरोधी लिखाण करणे) याखाली अटक झाली व खटला सुरु झाला. दादासाहेब खापर्ड्यांनी श्री. कोल्हटकरांना शेगांवास जाऊन श्री गजानन महाराजांची भेट घेऊन लोकमान्य टिळकांस सोडविण्यासाठी काही उपाय करता येईल ते सांगावे अशी विनंती करण्यास सांगितले. श्री. कोल्हटकर शेगांवांस आले. पण महाराज ३ दिवस काही ना बोलता निजून होते.
चवथे दिवशी समर्थ उठले । कोल्हटकरास बोलते झाले । तुम्ही अलोट प्रयत्न केले । परी फळ न येईल त्या ।।८५।।
अरे छत्रपती शिवाजीला । रामदासांचा वशिला । होता परि तो कैद झाला । बादशाही अमलात ।।८६।।
सज्जनांस त्रास झाल्याविना । राज्यक्रांती होईना । कंसाचा तो मनी आणा । इतिहास म्हणजे कळेल ।।८७।।
ही मी देतो भाकर । ती खाऊ घाला लौकर । टिळकांप्रति अंतर । यात काही करू नका ।।८८।।
या भाकरीच्या बळावरी । तो करील मोठी कामगिरी । जातो जरी फार दूरी । परि न त्याला इलाज ।।८९।।
श्री कोल्हटकरांना जरी मनात शंका होती, तरीदेखील त्यांनी ती भाकरी लोकमान्य टिळकांपर्यंत पोचवली. लोकमान्य टिळकांनी ती भाकरी कुस्करून खाल्ली - दातांमुळे तेव्हा लोकमान्य टिळकांना खाण्याचा त्रास होत होता. त्यांना आश्चर्य वाटले की आपल्या हातून कोणते मोठे कार्य घडणार आहे - परंतु ते बोलले की स्वामींच्या मनात काही गूढ आहे म्हणून ते असे म्हणाले.
पुढे श्री गजानन महाराजांचे वचन सत्य ठरून लोकमान्य टिळकांना शिक्षा झाली व त्यांना ब्रह्मदेशात, मंडाले येथे ठेवण्यात आले. तिथे त्यांनी श्री गीतारहस्य या ग्रंथाची निर्मिती केली.
यावच्चंद्रदिवाकर । पुरुष बाळ गंगाधर । चिरंजीव निरंतर । राहील कीर्ती रूपाने ।।१०८ ।।
No comments:
Post a Comment