Monday, November 23, 2009

सचिन तेंडुलकर आणि मराठीपण

सचिन तेंडुलकर आणि मराठीपण या विषयावर बर्‍याच भाषेतील अगणित माध्यमातून असंख्य चर्चा, लेख, आरोप, प्रती-आरोप छापून आलेले आहेत. पण या सगळ्या गदारोळात एक मुद्दा विसरला जातोय तो हा की सचिनचे म्हणणे होते की तो सगळ्यात आधी भारतीय आहे.


तो भारतीय संघात आहे - मराठी संघात नाही. तो मुंबई संघाकडून खेळतो - मराठी संघाकडून नव्हे.
त्याला मराठी असण्याचा अभिमान नक्कीच आहे पण ते त्याच्या खेळातील इर्षेचे कारण नव्हे. तो जेव्हा कुठल्याही क्रिकेट संघात असतो तेव्हा तो एक भारतीय खेळाडू असतो.
सचिनची कारकीर्द ही खेळाडूची आहे. क्रिकेट हे त्याने निवडलेले क्षेत्र आहे. त्याने क्रिकेटशिवाय दुसर्‍या कुठल्याही विषयावर भाष्य केलेले नाही. मग असे त्याच्या म्हणण्याचे राजकारणी भांडवल करण्याची काय आवश्यकता आहे?


बरे, मराठी म्हणून 'मराठी भाषा बोलता येते' या एका ओळखीशिवाय मराठी माणसाचा वेगळेपणाचा दुसरा काय मुद्दा आहे? फक्त महाराष्ट्रात राहतात म्हणून मराठी असे समजले जाते का? नाही. हा तर शिवसेनेचा आणि मनसेचा कळीचा मुद्दा आहे.
त्यांना जर मराठी माणसाला पुढे आणायचे असेल तर या सगळ्या राजकारणी / समाजकारणी पक्षांनी मराठी माणसांना कष्ट करायला शिकवावे. जसे सचिन तेंडुलकरने केले आहेत.
सचिनचे उदाहरण समोर ठेवून मराठी माणूस कष्ट करायला का तयार नाही? ५-१० वर्षे खस्ता खायला का तयार नाही?


काही पत्रकारांनी अशी खंत प्रकट केली आहे की इतर क्षेत्रांतील यशस्वी मराठी कार्यकर्त्यांची माहिती लोकांपुढे येत नाही. मग या पत्रकारांनी तसे कां करू नये? जे पत्रकार क्रिकेटबद्दल रकानेच्या रकाने भरतात, किंवा ज्यांचे पत्रकार मित्र असे लेख लिहितात, त्यांनी वेळीच असे लेखन थांबवून लोकोपयोगी लेखन कां करू नये?
काय म्हणता? आमची नोकरी जाईल? संपादकांनी सांगितले ते लिहावे लागते? मग असे बिनबुडाचे आरोप करतांना आणि लेख लिहितांना हे मधे नाही आले?
मराठीपणा जोपासणे ही सचिनची एकट्याची जबाबदारी नाही. जे लोक मराठी बोलतात, ज्यांना मराठीविषयी जिव्हाळा आहे त्या लोकांनी मराठीपणा पुढे न्यावा - तसे लोक जमा करावे. मराठी लोकांचा ऊत्कर्ष, यशस्वी लोकांचे कार्य पुढे आणावे.
मराठी लोकांची साथ करावी. एक मराठी पुढे चालला त्याला मागे ओढून मराठी लोकांचा उत्कर्ष होणार का? नक्कीच नाही. जो पुढे चालला त्याला म्हणावे हो पुढे - तुझ्या मागे आम्ही आणखी दहा मराठी पाठवतो.

बर्‍याच लोकांना कदाचित ठाऊक नसावे - राहुल द्रविड हाही मराठी भाषिकच आहे. त्याने काय म्हणावे अशी अपेक्षा आहे?

Wednesday, November 18, 2009

राहुल द्रविडची खेळी.

सचिन तेंडुलकरबद्दल जेव्हढे लिहिले, बोलले, ऐकले जाते त्यापेक्षा कितीतरी कमी राहुल द्रविडबद्दल चर्चा केली जाते. पण तरी राहुल सचिनयेव्हढाच खंबीरतेने खेळपट्टीवर पाय रोवून ऊभा असतो.

अहमदाबादच्या कसोटी सामन्यातली त्याची खेळी अगदी अप्रतीम होती. त्याची आणि मुरलीधरनची जुगलबंदी अगदी सुंदर रंगली. आणि शेवटी राहुलने केवळ मुरलिधरनवरंच मात केली असे नव्हे तर युवराज आणि धोनीला देखील त्याने कसे खेळायचे हे दाखवून त्यांना श्रीलंकेच्या गोलंदाजांचे चेंडू कसे खेळायचे हे जणू खेळपट्टीवरंच शिकवले.

मला माझ्या डोळ्यासमोर अजूनही दिसते की, मुरलिने निरनिराळे चेंडू फेकून राहुलला चकविण्याचा, बाद करण्याचा खूप प्रयत्न केला, परंतू राहुल त्या कठीण चेंडूंना इतक्या हळूवारपणे खेळला की त्या चेंडूंमधला विखार विझून गेला.
मुरलीचे ओफस्पीन, दूसरा, फास्टर वन, हे सगळे चेंडू तो इतक्या लीलया खेळला. इतकेच नाही तर आपल्याभोवती असलेल्या क्षेत्ररक्षकांच्या जाळ्यातून नजाकतीने चेंडू सीमापार पाठवला.

एव्ह्ढे असूनही त्याच्या मनात संघाचे विचार सुरू होते. स्वत:च्या धावांच्यापेक्षा संघाच्या किती धावा असायला ह्व्यात यांकडे त्याचे जास्त लक्ष्य होते.

असे खेळाडू कर्णधार धोनीबरोबर असताना त्याला फार काळजी असू नये.