मला पुन्हा मराठीतून लिहिणे सुरु करायचे आहे. यात काही लाजिरवाणे वाटण्यासारखे काही नाही, फक्त एक आळस दूर केला तर लिहिण्यासारखे बरेच विचार मनात असतात. आणि ते मनातच राहतात. आता असा विचार आहे की ते सगळे मनातले विचार - थोडेबहुत का होईना, वेळ मिळाल्यावर लगेच लिहून ठेवायचे. लिहिल्यावर त्या विचारांवर आणखीन पुढे मनन चिंतन होते, विचार प्रगल्भ होतात, आपल्याला नवे शब्द सुचतात. नवे शब्द वापरता येतात, जुन्या शब्दांवर नवीन कल्हई लावून नवीन शब्द तयार होतात.
कसं असतं, की मनात काही ना काही विचार घोळत असतात. ते विचार फुलपाखरा सारखे काही वेळ मनात येतात आणि त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही, तर तसेच उडून जातात. बरेच वेळा हे विचार चांगले विचार असतात, ज्यांना पकडून ठेवायला हवं, त्यावर विचार करायला हवा, त्यावर मनन करायला हवं आणि त्यानंतर ठरवायचं की हे विचार पुढे न्यायला हवेत की आता त्यांना पूर्णविराम द्यायला हवा. पण तसं होत नाही - ते विचार चांगले असोत वा नसोत, तसेच उडून जातात.