थ्री ईडियट्समधे वसतीगृहामधिल जीवन बरेच मनोरंजकरीत्या दाखविले आहे. काही प्रसंग तर अगदी सुंदर आणि सहज झालेले आहेत. मुख्य अभिनेत्यांचे काम सहज, भूमिकांशी एकरूप होवून झालेले आहे. चित्रपटाचा वेग बर्यापैकी जमलेला आहे. गोष्ट सोपी पण प्रेक्षकांना गुन्तवून ठेवणारी आहे. एकूण काय तर खिचड़ी नीट शिजलेली आहे.
मला आणि माझ्या मित्रांना (आणि बऱ्याच प्रेक्षकांना) आपल्या विद्यार्थीजीवनातले अनेक प्रसंग आठवले. दिग्दर्शक हिरानीने या छोट्या प्रसंगांतून चित्रपट पुढे नेलेला आहे. हे प्रसंग अत्यंत सहजपणे आणलेले आहेत - ओढून ताणून आणलेले वाटत नाहीत.
बाळंतपणाच्या प्रसंगावर सगळ्यांनीच टीका केलेली आहे. हा प्रसंग (असे म्हणतात) ऊपलब्ध असलेल्या वापर करून, आपली बुद्धी वापरून आलेल्या अडचणींवर मात कशी करता येऊ शकते हे दाखवायचा प्रयत्न आहे. त्यात प्रा. सहस्रबुद्धे यांचे मतपरिवर्तन करणे हा केवळ एकच या प्रसंगाचा उद्देश्य आहे. बाकी इतर कुठल्याही मसाला चित्रपटात अत्यंत चपखल बसणारा हा प्रसंग थ्री ईडियट्स मधे अत्यंत कृत्रिम वाटतो. कारण तोपर्यंत गोष्ट स्वाभाविकपणे पुढे जात होती. त्याला अचानक भावनाप्रधान वळण द्यायची गरज दिग्दर्शकाला भासली कारण यापुढे रॉंचो या पात्राला त्याला पुढे आणून इतर सगळ्यांना मागे सारायचे होते. शिवाय प्रा. सहस्रबुद्धे यांचे मतपरिवर्तन घडवून आणवायचे होते.
अश्या बऱ्याच गोष्टी नंतर खटकल्या तरी चित्रपटात त्या सुसंगत वाटतात आणि हे खरे दिग्दर्शकाचे व लेखकाचे यश आहे.
चित्रपटाने बरेच प्रश्नही ऊभे केलेले आहेत. बऱ्याच गोष्टींवर विचार करायला लावला आहे.
अभियांत्रिकीच्याच नव्हे तर इतर शाखेच्या विद्यार्थ्याँच्याही मनात परिक्षेच्या वेळी हेच प्रश्न येतात - आपण हे कशासाठी करातो आहोत ? या परिक्षेला आपल्या जीवनात काही अर्थ आहे का ? आणि या विचारांतूनच असे बुडबुडे बाहेर पडतात की शिक्षणपद्धती बदलायला हवी. हिरानी आणि मन्डळींनी असा विचार पुढे आणला आहे की उच्च श्रेणिंच्या विश्वविद्यालयात (जसे आय. आय. टी.) विद्यार्थ्यांनी धडाधड शोध लावायला हवेत, कठिण प्रश्नांवर काम करायला हवे, आपल्या भविष्याचा मुळीच विचार करायला नको आणि आपले आयुष्य शोधकार्यासाठी वाहून घ्यावे. या विश्वविद्यालयांतील शिक्षकांनी, प्राध्यापकांनी शिकवू नये आणि मुले जे काही वेडेवाकडे शोध लावताहेत त्यात आनंद मानून घ्यावा. अरे हे काय आहे ?
मला चित्रपट वाईट आहे असे म्हणायचे नाही. तो ऊत्कृष्टपणे सादर केला आहे. मला असे म्हणायचे आहे की असा विचार मांडणे चुकीचे आहे. उच्च श्रेणिंच्या विश्वविद्यालयात शोधकार्ये होतात. आपला विषय आवडणारे, अभ्यासू, कामसू विद्यार्थी शोधकार्याकडे जातात. आणि शिवाय, शोधकार्य काय विद्यालयातच होते काय? कारखान्यात, औद्योगिक प्रयोगशाळांत होत नाही काय ?
बरे, चित्रपटात म्हणा किंवा चेतन भगतच्या "फाइव्ह पॉइंट समथिंग" या पुस्तकात (ज्यावरून या चित्रपटाची कथा बेतलेली आहे) म्हणा, एक असा विचार मांडलेला आहे की जे हुषार व सरळमार्गी मुलं असतात, ती घोकम्पट्टीशिवाय जास्त मार्कं मिळवूच शकत नाहीत. पण असं नसतं - काही मुलांना शिकवलेलं नीट कळत असतं आणि ही मुलं परिक्षेत बरोबर ऊत्तरे लिहू शकतात.
कदाचित् हिरानी यांना असे म्हणायचे असेल की उच्च श्रेणिंच्या विश्वविद्यालयात विद्यार्थ्यांना रचनात्मक कार्य करण्यामागे वळवायचे. घोकंपट्टी न करता, विषय समजवून घ्या असे म्हणायचे असेल - पण त्यासाठी खरेच मेहनत करणाऱ्या मुलांना काळ्या रंगात रंगविण्याची काहीच आवश्यकता नव्हती. शिवाय, विद्यार्थ्यांवर मेहनत घेणारे प्राध्यापक असतात. माझे प्राध्यापक आपले विषय खरेच सोपे करून, अनेक उदाहरणे देउन, नीट समजावुन द्यायचे. चित्रपटातले प्राध्यापक हुषार परंतु एककल्ली असेच रंगविले आहेत.
तर एकुण सार असे की, चित्रपटाची गोष्ट अत्यंत रंजकतेने मांडलेली आहे परंतु त्यातले विचार मात्र प्रत्यक्षात आणण्याजोगे नाहित. चित्रपट पहावा आणि तो चित्रपटग्रुहातच ठेउन यावा.