क्रिकेट या खेळाने खेळाडूंशिवाय किती तरी लोकांना आनंद दिलाय. किती लोकांच्या घरांत क्रिकेटमुळे चहातल्या कपात वादळे येऊन शांत झालेली आहेत. किती लोकांनी क्रिकेटवर लेखन करून इतरांना आनंद दिला आहे. किती लोकांनी त्या लेखनावर टीका करून त्याहून जास्त आनंद मिळवला आहे. तासन्तास क्रिकेटवर गप्पा मारलेल्या आहेत. आपल्याला क्रिकेटमधील कि हा र्हस्व की दीर्घ ही शंका असूनही खेळाडूंना त्यांचा खेळ कसा सुधरवता येईल यावर फुकटचे सल्ले दिलेले आहेत.
क्रिकेट हा कदाचित एकटाच खेळ असेल जो न खेळणारे हे खेळाडूंपेक्षा जास्त ज्ञानी असू शकतात (असे त्या ज्ञानी लोकांना वाटते). बरे, प्रत्येकाला वाटते की आपणच ते - आपलं ते मत .. बाकीच्यांची ती तोंडाची वाफ.
आता असे पहा की तुम्ही जी क्रिकेट मॅच पाहता आहात ती मॅच सगळेच पाहत आहेत. तुम्ही जर क्रिकइन्फोवर दिवसभर पडिक
असाल तर तेही असू शकतात. तुम्ही कुठले लेख वाचत असाल तर तेही काही वाचत असणार. मग असं असताना त्यांनी तुमची (वायफळ) बडबड का ऐकून घ्यायची ? हां, आता तुम्ही रवि शास्त्री असाल, आणि टी. व्ही. लावल्यावर जबरदस्ती तुमचा आवाज आणि मत ऐकावे लागणार असेल, तर ऐकल्याशिवाय गत्यंतर नाही.
आणि रवि शास्त्री, सुनील गावसकर, लक्ष्मण शि., .. झालंच तर बॉयकॉट, इयान चॅपेल या लोकांची गोष्टच वेगळी आहे. आता फलंदाज बाद झाला हे कोण ठरवणार? पंच ? छे छे .. त्याचा काय संबंध ? जर या समालोचकांपैकी कोणाला जर (जवळ जवळ १०० यार्डांवरून) तो बाद आहे असे वाटले तरच. आणि यानंतर पंच जर यांच्याशी सहमत नसेल, तर ती पंचाची चूक. कारण हे तर सर्वज्ञानी, सर्वसाक्षी. पंच फलंदाजाच्या केवळ २२-२४ यार्ड दूर असेल, त्याला स्वच्छ दिसत असेल की या गड्याने आता बॅट सोडून घराचा रस्ता धरावा. पण, हे लोक कसं सांगणार, की अरेरे, काय या बिचार्याचे नशीब. केवळ खोटेपणाने याला परत जावे लागते आहे.
पण मग पुढे २ मिनिटांनी काय होते ? रिप्ले दिसतात. आणि यांचे पितळ ऊघडे पडते. दूध का दूध और पानी का पानी. मग काय त्या पंचाच्या तारिफीच्या मजल्यावर मजले चढतात. हाच तो जगातला सर्वोत्तम पंच! हा नसता तर ही मॅच वाया गेली असती.
पण जर का हा निर्णय चुकीचा निघाला, तर त्या पंचाच्या दुर्दैवाला पारावार नसतो. त्याने पैसे खाल्लेले असतात. तो पक्षपाती असतो. तो आन्तरराष्ट्रिय सामन्यात पंचगीरी करण्याच्या लायकीचा नसतो. त्याने सरळ दूध विकायचा धंदा सुरू करावा यावर या सर्वांचे एकमत होते.
पण प्रेक्षकांचे काय? ज्यांसाठी हा सगळा खटाटोप चाललेला आहे, त्यांना कोणी विचारते आहे का ? मैदानावर जाउन जे लोक मॅच पाहतात, ते खरे प्रेक्षक .. घरी बसू, आपल्या आरामखुर्चित बसून जे मॅच पाहतात, ते तर टी. व्ही. चा पडदा बघणारे लोक. ते खरे क्रिकेटचे रसास्वादी नव्हेत. अशा प्रेक्षकांच काय असतं की त्यांचा संघ हरायला लागला की हे चॅनेल बदलणार. खरा क्रिकेटमधे रस असणारा प्रेक्षक शेवटपर्यंत आपल्या संघाची बाजू सोडणार नाही. संघ हरो वा जिंको.
खरा क्रिकेटप्रेमी, पाऊस, वारा, ऊन, थन्डी आणि इतर गैरसोय हे सगळे सहन करून, मैदानावर जाऊन सामना बघणार.
त्याला मिळणारा आनंद तो खरा. त्याचे मत हे या सगळ्यांनी ऐकायला हवे.
1 comment:
भारतीय खेळाडू सरावाच्या नावाखाली स्टॅमिनाकडे दुर्लक्ष करीत असल्याने त्याना जिकून देणे यारीतीने शक्य होईल असे वाटत नाही.
Post a Comment