प्रेशर, टेन्षन, स्ट्रेस, दबाव,या सगळ्या गोष्टी आपल्या मनाचे खेळ आहेत. घटना त्याच असतात - पण वेगवेगळे लोक त्याच घटनांना वेगवेगळे तोंड देतात. काही खचून जातात तर काही खंबीरपणे उभे राहतात आणि त्या वाईट घटनांमधून काही चांगले घेऊन बाहेर पडतात.
मग दु:खी घटनांमधून चांगले कसे शोधायचे?
खरे तर या विषयावर हजारो पुस्तके लिहिली गेली आहेत. सुखी कसे व्हायचे ? या प्रश्नावर तर सगळे बुवा आणि महाराज जगतात.
शिवाय असंख्य मनोरूग्ण वैद्य, तांत्रीक, मान्त्रीक, लेखक, वक्ते, प्रकाशक, आणि इतर अनेक सहायक उद्योगात असलेले लोक यावर जगतात.
एवढेच काय, नेते आणि राजे (म्हणजे राज्यकर्ते .. आडनाव नव्हे ते) यांचे अस्तित्वच या प्रश्नावर अवलंबून आहे. आपण त्यांना का
निवडून देतो ? त्यांनी लोकांना चांगले वाटावे, सुख वाटावे असे काही काम करावे म्हणून.
पण असे पहा की वाटणे हे आपल्या स्वत:वर अवलंबून आहे. आपल्याला काय वाटते हे कोणी कसे ठरवणार ?
प्रश्न पुढे असा की आपल्या मनावर आपला ताबा आहे का ?
मन म्हणजे तरी काय ? आपल्या मेंदूत चाललेले विचार. आपण कोण ? आपले विचार. आपल्या मनात / मेंदूत जर
काही विचार नसतील तर आपल्याला अस्तित्व आहे का ?
म्हणजेच हे सगळे आपल्या मनाचेच खेळ नाहीत का ? आपण जर त्यातले काही विचार / खेळ नाकारले, तर ऊरलेले
विचार हे आपल्याला हवे असलेले विचार आहेत. आणि हे विचार चांगले, सुखी विचार असतील तर आपल्याला
ताण कमी वाटेल.
तो ताण कमी करण्यासाठी लोक बरेच काही करतात. शारीरिक व्यायाम, वाचन, गप्पा, लिहीणे, चित्रकारी, आणि बरेच काही.
माझ्या मते कला हा प्रकार केवळ आपले मन गुंतवण्यासाठी, मनाला सतत कशात तरी गर्क ठेवण्यासाठी आहे.
आणि असे मन गुंतल्यामुळे, मनाला इतर दु:खद गोष्टींचा विचार करायला वेळ मिळत नाही.
No comments:
Post a Comment