Thursday, December 3, 2009

गंभीरची सुटी

व्यवसाय की परिवार या प्रश्नावर गौतम गंभीर याने अत्यंत विचारी (नावाप्रमाणे गंभीरपणे विचार करुन) निर्णय घेतला असेल. त्याने असा निर्णय घेतला की क्रिकेट कसोटी सामना न खेळता आपल्या सख्ख्या बहिणीच्या लग्नाला जायचे.
खरे म्हणजे हा काळ त्याच्या खेळाचा अत्यंत कर्तुत्वाचा काळ. गेल्या दीड वर्षाच्या काळात गौतम गंभीर हा भारताच्या क्रिकेट संघाचा सर्वात भरवशाचा व सातत्याने फलंदाजी करणारा खेळाडू आहे. त्यामुळेच त्याची भारतीय संघातली जागा निश्चित आहे. किंबहुना भारताला त्याच्या सारख्या संयत आणि निश्चयी खेळाडूची आवश्यकता आहे. त्याने असे असताना एक कसोटी सामना न खेळण्याचा आश्चर्यकारक निर्णय घेतला याचे नवल वाटते. त्याहीपेक्षा भारतीय क्रिकेट बोर्डाने त्याला सुटी मंजूर केली याचे जास्त नवल.
याहून पुढे जाऊन विचार करता असे वाटते की हा एक ऐतिहासिक निर्णय ठरावा. कारण कोणी भारतीय क्रिकेट संघातून असे कौटुंबिक कारण देऊन कसोटी सामना न खेळलेले ऐकिवात नाही. सुनील गावसकर हा एकटाच खेळाडू होता जो हे करू शकला असता. पण त्यानेदेखील खेळण्याचा निर्णय घेतला - तो जवळ जवळ ९० कसोटी सामने सलग खेळला. इतर खेळाडू देखील सामने खेळले नाहीत ते केवळ जखमी असल्यामुळे.
इतर काही खेळाडूंनी आपले कौटुंबिक समारंभ ज्या काळात क्रिकेट सामने नसतात अशा काळात उरकून घेतले आहेत. उदहरणार्थ लक्ष्मण, राहुल द्रविड, इत्यादी.

साहजिकच या निर्णयामागे धोनी असेलच. त्याने संमती दिल्याशिवाय गंभीर असे करणे शक्यच नाही. या जागी धोनीने दाखवले आहे की तो एका कुशल व्यवस्थापकही आहे. त्याचबरोबर त्याने असाही संकेत दिला आहे की तो एक असा संघ तयार करतो आहे ज्यात संघ कोणा एका खेळाडूवर अवलंबून राहणार नाही. यामुळे मुरली विजय या फलंदाजाला जवळ जवळ एका वर्षानंतर संधी मिळाली आहे. गेल्या वेळेसही गंभीरच्या जागेवरच विजयला संधी मिळाली होती.
बर्‍याच व्यवसायिकांच्या जीवनातही अशी वेळ येताच असेल की जेव्हा व्यवसाय की परिवार यांपैकी एक निवडणे आवश्यक होते. आपल्याला असे दिसते की परिवाराकड़े / कुटुम्बाकडे दुर्लक्ष केले जाते आणि व्यवसायाला प्राधान्य दिले जाते. एका व्यावसायिकाचा दिवसातला जास्तीत जास्त वेळ आपल्या परिवारापासून दूर जात असतो. त्यातल्या त्यात एका यशस्वी क्रिकेटपटुचे जीवन हे धकाधकिचे. गंभीरने आपल्या परिवारालाही महत्व देऊन एक प्रकाराचा पायंडा पाडला आहे असे म्हणायला हरकत नाही.

No comments: