Tuesday, December 27, 2022

पुन्हा एकदा

 मला पुन्हा मराठीतून लिहिणे सुरु करायचे आहे. यात काही लाजिरवाणे वाटण्यासारखे काही नाही, फक्त एक आळस दूर केला तर लिहिण्यासारखे बरेच विचार मनात असतात.  आणि ते मनातच राहतात. आता असा विचार आहे की ते सगळे मनातले विचार - थोडेबहुत का होईना, वेळ  मिळाल्यावर लगेच लिहून ठेवायचे.  लिहिल्यावर त्या विचारांवर आणखीन पुढे मनन चिंतन होते, विचार प्रगल्भ होतात, आपल्याला नवे शब्द सुचतात.  नवे शब्द वापरता येतात, जुन्या शब्दांवर नवीन कल्हई लावून नवीन शब्द तयार होतात. 

कसं असतं, की मनात काही ना काही विचार घोळत असतात.  ते विचार फुलपाखरा सारखे काही वेळ मनात येतात आणि त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही, तर तसेच उडून जातात.  बरेच वेळा हे विचार चांगले विचार असतात, ज्यांना पकडून ठेवायला हवं, त्यावर विचार करायला हवा, त्यावर मनन करायला हवं  आणि त्यानंतर ठरवायचं की हे विचार पुढे न्यायला हवेत की आता त्यांना पूर्णविराम द्यायला हवा.  पण तसं होत नाही - ते विचार चांगले असोत वा नसोत, तसेच उडून जातात. 


 

Sunday, April 19, 2020

होशंगाबादच्या आठवणी

चारुदादा 
उदय,शेखर होशंगाबाद ला आपल्याकडे बंडखोर बंडू ची पुस्तकं होती(जी वाचून शेखर नी बर्याच पुस्तकांमधल्या चित्रांना दाढी मिश्या काढल्या होत्या)
मला मुलींच्या जुन्या collection मधे just William, William again पुस्तकं भेटली.वाचायला लागलो तर अगदी same to same.
एकदा बघून सांगा.

दिपकदादाची आठवण
चारुहास, होषंगाबाद मधील  आपण  1972मध्ये उन्हाळ्याची सुट्टी घालवली ते माझ्या आयुष्यातले सर्वात आनंददायी दिवस होते. उदयची महाबली वेताळ आणि रिडर्स डायजेस्ट, वुडहाउस अशी अनेक पुस्तकं वाचून काढली होती. आणि रोज नर्मदेच्या घाटावर पोहायला जायचे मला अजूनही आठवते. शिवाय  उदयचे मित्र  मच्छर आणि गोपाळ व हरीश बिश्त अजूनही आठवणीत आहेत. ते दिवस खूप मजेशीर होते.
 मावशीच्या हातचे जेवण, नदीच्या तीरावरचे  नर्मदामय्येचे मंदीर, पोहून दमल्यानंतर खाल्लेली दहीकचौरी आणि नंतर बच्चोने क्या क्या खाया म्हणून श्यामाकाकांनी प्रेमाने भरलेले पैसे .... सगळेच भारी... अविस्मरणीय! कोई लौटा दे मेरे बीते हुए दिन!

शेखर - 
मी चौथीत/पाचवीत असतांना होशंगाबादला ग़ेलो होतो. जाताना सुमनताई बरोबर गेलो. परत नागपुरला येताना एकटाच आलो.
चारूदादा आणि ऊदुदादा बरोबर खुपच मज़ा क़ेली होती. इंद्रजाल कॉमिक्स साठी भांड्णे ..दर दोन आठवडयानी ते कॉमिक्स यायचे. त्यासाठी ऊदुदादा रस्त्यावरच पोस्टमनला पकडायचा. त्यामुळे मला त्याचे वाचून होइपर्यंत वाट बघायला लागायची. शामाकाकांनी मला पोहणे शिकवायचा खूप प्रयत्न केला पण मी नर्मदेवर नुसताच जाऊन परत यायचो. क्रिकेट रोज संध्याकाळी .. खूप खूप पुस्तकं, काॅमिक्स. मग मला एकदा क्रिकेट टीम बरोबर भोपाळला नेलं. मी बहुतेक १५ किंवा १६ वा खेळाडू असेन. टोप्या सांभाळणारा.
केवळ इंद्रजाल कॉमिक्स नाहीत तर चंपक, चाचा चौधरी, मराठी पुस्तकं .. काय नव्हतं त्या खजिन्यात. हो .. क्रिकेट ची पुस्तकं सुद्धा.
शिवाय नीट बाईंड केलेली जुनी कॉमिक्स. मला त्यातल्या त्यात फ्लॅश गॉर्डन आवडायचा. पण त्याची कॉमिक्स बर्याच दिवसांनी यायची. मँड्रेक दुसऱ्या नंबरवर. त्यातल्या त्यात जेव्हा तो त्या कार वॉश मधून, कुठल्या तरी लिफ्ट मधून त्या गुप्तहेर खात्याच्या प्रमुखाला भेटायला जायचा ते मला फार आवडायचं - अजूनही. आणि त्याचा तो शेफ डोजो.

सगळे रात्री जेवायला मिळून बसायचे.
एक दोन वेळा आईस्क्रीम पण झालं होतं.
मी त्यातल्या त्यात उदुदादाच्या मागे मागे असायचो. मला त्याच्या सहा बोटांचं खूप कुतूहल वाटायचं .. काहीतरी स्पेशल आहे असं.. आणि शिवाय त्याला जास्त काही शारीरिक धावपळ आवडायची नाही .. चारुदादा आणि इतर मित्रांच्या मानाने .. ते मला जास्त परवडायचं. 
येताना मला तिकीट काढून सकाळी ७ ला नागपूरच्या गाडीत बसवून दिले. मी ४-५ वाजता अजनीला ऊतरून घरी गेलो रीक्शाने .. आणि बाबा मला शोधायला नागपूर स्टेशनवर वाट बघत बसले होते. मला बिंदूआत्याने डब्बा आणि चिवडा दिला होता .. तो मी खात आणि पुस्तक वाचत आलो.

Tuesday, March 2, 2010

थ्री ईडियट्स - माझे भाष्य

थ्री ईडियट्समधे वसतीगृहामधिल जीवन बरेच मनोरंजकरीत्या दाखविले आहे. काही प्रसंग तर अगदी सुंदर आणि सहज झालेले आहेत. मुख्य अभिनेत्यांचे काम सहज, भूमिकांशी एकरूप होवून झालेले आहे. चित्रपटाचा वेग बर्यापैकी जमलेला आहे. गोष्ट सोपी पण प्रेक्षकांना गुन्तवून ठेवणारी आहे. एकूण काय तर खिचड़ी नीट शिजलेली आहे.

मला आणि माझ्या मित्रांना (आणि बऱ्याच प्रेक्षकांना) आपल्या विद्यार्थीजीवनातले अनेक प्रसंग आठवले. दिग्दर्शक हिरानीने या छोट्या प्रसंगांतून चित्रपट पुढे नेलेला आहे. हे प्रसंग अत्यंत सहजपणे आणलेले आहेत - ओढून ताणून आणलेले वाटत नाहीत.
बाळंतपणाच्या प्रसंगावर सगळ्यांनीच टीका केलेली आहे. हा प्रसंग (असे म्हणतात) ऊपलब्ध असलेल्या  वापर करून, आपली बुद्धी वापरून आलेल्या अडचणींवर मात कशी करता येऊ शकते हे दाखवायचा प्रयत्न आहे. त्यात प्रा. सहस्रबुद्धे यांचे मतपरिवर्तन करणे हा केवळ एकच या प्रसंगाचा उद्देश्य आहे. बाकी इतर कुठल्याही मसाला चित्रपटात अत्यंत चपखल बसणारा हा प्रसंग थ्री ईडियट्स मधे अत्यंत कृत्रिम वाटतो. कारण तोपर्यंत गोष्ट स्वाभाविकपणे पुढे जात होती. त्याला अचानक भावनाप्रधान वळण द्यायची गरज दिग्दर्शकाला भासली कारण यापुढे रॉंचो या पात्राला त्याला पुढे आणून इतर सगळ्यांना मागे सारायचे होते. शिवाय प्रा. सहस्रबुद्धे यांचे मतपरिवर्तन घडवून आणवायचे होते.
अश्या बऱ्याच गोष्टी नंतर खटकल्या तरी चित्रपटात त्या सुसंगत वाटतात आणि हे खरे दिग्दर्शकाचे व लेखकाचे यश आहे.

चित्रपटाने बरेच प्रश्नही ऊभे केलेले आहेत. बऱ्याच गोष्टींवर विचार करायला लावला आहे.
अभियांत्रिकीच्याच नव्हे तर इतर शाखेच्या विद्यार्थ्याँच्याही मनात परिक्षेच्या वेळी हेच प्रश्न येतात - आपण हे कशासाठी करातो आहोत ? या परिक्षेला आपल्या जीवनात काही अर्थ आहे का ? आणि या विचारांतूनच असे बुडबुडे बाहेर पडतात की शिक्षणपद्धती बदलायला हवी. हिरानी आणि मन्डळींनी असा विचार पुढे आणला आहे की उच्च श्रेणिंच्या विश्वविद्यालयात (जसे आय. आय. टी.) विद्यार्थ्यांनी धडाधड शोध लावायला हवेत, कठिण प्रश्नांवर काम करायला हवे, आपल्या भविष्याचा मुळीच विचार करायला नको आणि आपले आयुष्य शोधकार्यासाठी वाहून घ्यावे. या विश्वविद्यालयांतील शिक्षकांनी, प्राध्यापकांनी शिकवू नये आणि मुले जे काही वेडेवाकडे शोध लावताहेत त्यात आनंद मानून घ्यावा.  अरे हे काय आहे ?
मला चित्रपट वाईट आहे असे म्हणायचे नाही. तो ऊत्कृष्टपणे सादर केला आहे. मला असे म्हणायचे आहे की असा विचार मांडणे चुकीचे आहे.  उच्च श्रेणिंच्या विश्वविद्यालयात शोधकार्ये होतात. आपला विषय आवडणारे, अभ्यासू, कामसू विद्यार्थी शोधकार्याकडे जातात. आणि शिवाय, शोधकार्य काय विद्यालयातच होते काय? कारखान्यात, औद्योगिक प्रयोगशाळांत होत नाही काय ?
बरे, चित्रपटात म्हणा किंवा चेतन भगतच्या "फाइव्ह पॉइंट समथिंग" या पुस्तकात (ज्यावरून या चित्रपटाची कथा बेतलेली आहे) म्हणा, एक असा विचार मांडलेला आहे की जे हुषार व सरळमार्गी मुलं असतात, ती घोकम्पट्टीशिवाय जास्त मार्कं मिळवूच शकत नाहीत. पण असं नसतं - काही मुलांना शिकवलेलं नीट कळत असतं आणि ही मुलं परिक्षेत बरोबर ऊत्तरे लिहू शकतात. 

कदाचित् हिरानी यांना असे म्हणायचे असेल की उच्च श्रेणिंच्या विश्वविद्यालयात विद्यार्थ्यांना रचनात्मक कार्य करण्यामागे वळवायचे. घोकंपट्टी न करता, विषय समजवून घ्या असे म्हणायचे असेल - पण त्यासाठी खरेच मेहनत करणाऱ्या मुलांना काळ्या रंगात रंगविण्याची काहीच आवश्यकता नव्हती. शिवाय, विद्यार्थ्यांवर मेहनत घेणारे प्राध्यापक असतात. माझे प्राध्यापक आपले विषय खरेच सोपे करून, अनेक उदाहरणे देउन, नीट समजावुन द्यायचे. चित्रपटातले प्राध्यापक हुषार परंतु एककल्ली असेच रंगविले आहेत.

तर एकुण सार असे की, चित्रपटाची गोष्ट अत्यंत रंजकतेने मांडलेली आहे परंतु त्यातले विचार मात्र प्रत्यक्षात आणण्याजोगे नाहित. चित्रपट पहावा आणि तो चित्रपटग्रुहातच ठेउन यावा.

Thursday, December 3, 2009

गंभीरची सुटी

व्यवसाय की परिवार या प्रश्नावर गौतम गंभीर याने अत्यंत विचारी (नावाप्रमाणे गंभीरपणे विचार करुन) निर्णय घेतला असेल. त्याने असा निर्णय घेतला की क्रिकेट कसोटी सामना न खेळता आपल्या सख्ख्या बहिणीच्या लग्नाला जायचे.
खरे म्हणजे हा काळ त्याच्या खेळाचा अत्यंत कर्तुत्वाचा काळ. गेल्या दीड वर्षाच्या काळात गौतम गंभीर हा भारताच्या क्रिकेट संघाचा सर्वात भरवशाचा व सातत्याने फलंदाजी करणारा खेळाडू आहे. त्यामुळेच त्याची भारतीय संघातली जागा निश्चित आहे. किंबहुना भारताला त्याच्या सारख्या संयत आणि निश्चयी खेळाडूची आवश्यकता आहे. त्याने असे असताना एक कसोटी सामना न खेळण्याचा आश्चर्यकारक निर्णय घेतला याचे नवल वाटते. त्याहीपेक्षा भारतीय क्रिकेट बोर्डाने त्याला सुटी मंजूर केली याचे जास्त नवल.
याहून पुढे जाऊन विचार करता असे वाटते की हा एक ऐतिहासिक निर्णय ठरावा. कारण कोणी भारतीय क्रिकेट संघातून असे कौटुंबिक कारण देऊन कसोटी सामना न खेळलेले ऐकिवात नाही. सुनील गावसकर हा एकटाच खेळाडू होता जो हे करू शकला असता. पण त्यानेदेखील खेळण्याचा निर्णय घेतला - तो जवळ जवळ ९० कसोटी सामने सलग खेळला. इतर खेळाडू देखील सामने खेळले नाहीत ते केवळ जखमी असल्यामुळे.
इतर काही खेळाडूंनी आपले कौटुंबिक समारंभ ज्या काळात क्रिकेट सामने नसतात अशा काळात उरकून घेतले आहेत. उदहरणार्थ लक्ष्मण, राहुल द्रविड, इत्यादी.

साहजिकच या निर्णयामागे धोनी असेलच. त्याने संमती दिल्याशिवाय गंभीर असे करणे शक्यच नाही. या जागी धोनीने दाखवले आहे की तो एका कुशल व्यवस्थापकही आहे. त्याचबरोबर त्याने असाही संकेत दिला आहे की तो एक असा संघ तयार करतो आहे ज्यात संघ कोणा एका खेळाडूवर अवलंबून राहणार नाही. यामुळे मुरली विजय या फलंदाजाला जवळ जवळ एका वर्षानंतर संधी मिळाली आहे. गेल्या वेळेसही गंभीरच्या जागेवरच विजयला संधी मिळाली होती.
बर्‍याच व्यवसायिकांच्या जीवनातही अशी वेळ येताच असेल की जेव्हा व्यवसाय की परिवार यांपैकी एक निवडणे आवश्यक होते. आपल्याला असे दिसते की परिवाराकड़े / कुटुम्बाकडे दुर्लक्ष केले जाते आणि व्यवसायाला प्राधान्य दिले जाते. एका व्यावसायिकाचा दिवसातला जास्तीत जास्त वेळ आपल्या परिवारापासून दूर जात असतो. त्यातल्या त्यात एका यशस्वी क्रिकेटपटुचे जीवन हे धकाधकिचे. गंभीरने आपल्या परिवारालाही महत्व देऊन एक प्रकाराचा पायंडा पाडला आहे असे म्हणायला हरकत नाही.

Monday, November 23, 2009

सचिन तेंडुलकर आणि मराठीपण

सचिन तेंडुलकर आणि मराठीपण या विषयावर बर्‍याच भाषेतील अगणित माध्यमातून असंख्य चर्चा, लेख, आरोप, प्रती-आरोप छापून आलेले आहेत. पण या सगळ्या गदारोळात एक मुद्दा विसरला जातोय तो हा की सचिनचे म्हणणे होते की तो सगळ्यात आधी भारतीय आहे.


तो भारतीय संघात आहे - मराठी संघात नाही. तो मुंबई संघाकडून खेळतो - मराठी संघाकडून नव्हे.
त्याला मराठी असण्याचा अभिमान नक्कीच आहे पण ते त्याच्या खेळातील इर्षेचे कारण नव्हे. तो जेव्हा कुठल्याही क्रिकेट संघात असतो तेव्हा तो एक भारतीय खेळाडू असतो.
सचिनची कारकीर्द ही खेळाडूची आहे. क्रिकेट हे त्याने निवडलेले क्षेत्र आहे. त्याने क्रिकेटशिवाय दुसर्‍या कुठल्याही विषयावर भाष्य केलेले नाही. मग असे त्याच्या म्हणण्याचे राजकारणी भांडवल करण्याची काय आवश्यकता आहे?


बरे, मराठी म्हणून 'मराठी भाषा बोलता येते' या एका ओळखीशिवाय मराठी माणसाचा वेगळेपणाचा दुसरा काय मुद्दा आहे? फक्त महाराष्ट्रात राहतात म्हणून मराठी असे समजले जाते का? नाही. हा तर शिवसेनेचा आणि मनसेचा कळीचा मुद्दा आहे.
त्यांना जर मराठी माणसाला पुढे आणायचे असेल तर या सगळ्या राजकारणी / समाजकारणी पक्षांनी मराठी माणसांना कष्ट करायला शिकवावे. जसे सचिन तेंडुलकरने केले आहेत.
सचिनचे उदाहरण समोर ठेवून मराठी माणूस कष्ट करायला का तयार नाही? ५-१० वर्षे खस्ता खायला का तयार नाही?


काही पत्रकारांनी अशी खंत प्रकट केली आहे की इतर क्षेत्रांतील यशस्वी मराठी कार्यकर्त्यांची माहिती लोकांपुढे येत नाही. मग या पत्रकारांनी तसे कां करू नये? जे पत्रकार क्रिकेटबद्दल रकानेच्या रकाने भरतात, किंवा ज्यांचे पत्रकार मित्र असे लेख लिहितात, त्यांनी वेळीच असे लेखन थांबवून लोकोपयोगी लेखन कां करू नये?
काय म्हणता? आमची नोकरी जाईल? संपादकांनी सांगितले ते लिहावे लागते? मग असे बिनबुडाचे आरोप करतांना आणि लेख लिहितांना हे मधे नाही आले?
मराठीपणा जोपासणे ही सचिनची एकट्याची जबाबदारी नाही. जे लोक मराठी बोलतात, ज्यांना मराठीविषयी जिव्हाळा आहे त्या लोकांनी मराठीपणा पुढे न्यावा - तसे लोक जमा करावे. मराठी लोकांचा ऊत्कर्ष, यशस्वी लोकांचे कार्य पुढे आणावे.
मराठी लोकांची साथ करावी. एक मराठी पुढे चालला त्याला मागे ओढून मराठी लोकांचा उत्कर्ष होणार का? नक्कीच नाही. जो पुढे चालला त्याला म्हणावे हो पुढे - तुझ्या मागे आम्ही आणखी दहा मराठी पाठवतो.

बर्‍याच लोकांना कदाचित ठाऊक नसावे - राहुल द्रविड हाही मराठी भाषिकच आहे. त्याने काय म्हणावे अशी अपेक्षा आहे?

Wednesday, November 18, 2009

राहुल द्रविडची खेळी.

सचिन तेंडुलकरबद्दल जेव्हढे लिहिले, बोलले, ऐकले जाते त्यापेक्षा कितीतरी कमी राहुल द्रविडबद्दल चर्चा केली जाते. पण तरी राहुल सचिनयेव्हढाच खंबीरतेने खेळपट्टीवर पाय रोवून ऊभा असतो.

अहमदाबादच्या कसोटी सामन्यातली त्याची खेळी अगदी अप्रतीम होती. त्याची आणि मुरलीधरनची जुगलबंदी अगदी सुंदर रंगली. आणि शेवटी राहुलने केवळ मुरलिधरनवरंच मात केली असे नव्हे तर युवराज आणि धोनीला देखील त्याने कसे खेळायचे हे दाखवून त्यांना श्रीलंकेच्या गोलंदाजांचे चेंडू कसे खेळायचे हे जणू खेळपट्टीवरंच शिकवले.

मला माझ्या डोळ्यासमोर अजूनही दिसते की, मुरलिने निरनिराळे चेंडू फेकून राहुलला चकविण्याचा, बाद करण्याचा खूप प्रयत्न केला, परंतू राहुल त्या कठीण चेंडूंना इतक्या हळूवारपणे खेळला की त्या चेंडूंमधला विखार विझून गेला.
मुरलीचे ओफस्पीन, दूसरा, फास्टर वन, हे सगळे चेंडू तो इतक्या लीलया खेळला. इतकेच नाही तर आपल्याभोवती असलेल्या क्षेत्ररक्षकांच्या जाळ्यातून नजाकतीने चेंडू सीमापार पाठवला.

एव्ह्ढे असूनही त्याच्या मनात संघाचे विचार सुरू होते. स्वत:च्या धावांच्यापेक्षा संघाच्या किती धावा असायला ह्व्यात यांकडे त्याचे जास्त लक्ष्य होते.

असे खेळाडू कर्णधार धोनीबरोबर असताना त्याला फार काळजी असू नये.

Sunday, October 25, 2009

क्रिकेटचा आनंद

क्रिकेट या खेळाने खेळाडूंशिवाय किती तरी लोकांना आनंद दिलाय. किती लोकांच्या घरांत क्रिकेटमुळे चहातल्या कपात वादळे येऊन शांत झालेली आहेत. किती लोकांनी क्रिकेटवर लेखन करून इतरांना आनंद दिला आहे. किती लोकांनी त्या लेखनावर टीका करून त्याहून जास्त आनंद मिळवला आहे. तासन्तास क्रिकेटवर गप्पा मारलेल्या आहेत. आपल्याला क्रिकेटमधील कि हा र्‍हस्व की दीर्घ ही शंका असूनही खेळाडूंना त्यांचा खेळ कसा सुधरवता येईल यावर फुकटचे सल्ले दिलेले आहेत.

क्रिकेट हा कदाचित एकटाच खेळ असेल जो न खेळणारे हे खेळाडूंपेक्षा जास्त ज्ञानी असू शकतात (असे त्या ज्ञानी लोकांना वाटते). बरे, प्रत्येकाला वाटते की आपणच ते - आपलं ते मत .. बाकीच्यांची ती तोंडाची वाफ.
आता असे पहा की तुम्ही जी क्रिकेट मॅच पाहता आहात ती मॅच सगळेच पाहत आहेत. तुम्ही जर क्रिकइन्फोवर दिवसभर पडिक
असाल तर तेही असू शकतात. तुम्ही कुठले लेख वाचत असाल तर तेही काही वाचत असणार. मग असं असताना त्यांनी तुमची (वायफळ) बडबड का ऐकून घ्यायची ? हां, आता तुम्ही रवि शास्त्री असाल, आणि टी. व्ही. लावल्यावर जबरदस्ती तुमचा आवाज आणि मत ऐकावे लागणार असेल, तर ऐकल्याशिवाय गत्यंतर नाही.

आणि रवि शास्त्री, सुनील गावसकर, लक्ष्मण शि., .. झालंच तर बॉयकॉट, इयान चॅपेल या लोकांची गोष्टच वेगळी आहे. आता फलंदाज बाद झाला हे कोण ठरवणार? पंच ? छे छे .. त्याचा काय संबंध ? जर या समालोचकांपैकी कोणाला जर (जवळ जवळ १०० यार्डांवरून) तो बाद आहे असे वाटले तरच. आणि यानंतर पंच जर यांच्याशी सहमत नसेल, तर ती पंचाची चूक. कारण हे तर सर्वज्ञानी, सर्वसाक्षी. पंच फलंदाजाच्या केवळ २२-२४ यार्ड दूर असेल, त्याला स्वच्छ दिसत असेल की या गड्याने आता बॅट सोडून घराचा रस्ता धरावा. पण, हे लोक कसं सांगणार, की अरेरे, काय या बिचार्याचे नशीब. केवळ खोटेपणाने याला परत जावे लागते आहे.
पण मग पुढे २ मिनिटांनी काय होते ? रिप्ले दिसतात. आणि यांचे पितळ ऊघडे पडते. दूध का दूध और पानी का पानी. मग काय त्या पंचाच्या तारिफीच्या मजल्यावर मजले चढतात. हाच तो जगातला सर्वोत्तम पंच! हा नसता तर ही मॅच वाया गेली असती.
पण जर का हा निर्णय चुकीचा निघाला, तर त्या पंचाच्या दुर्दैवाला पारावार नसतो. त्याने पैसे खाल्लेले असतात. तो पक्षपाती असतो. तो आन्तरराष्ट्रिय सामन्यात पंचगीरी करण्याच्या लायकीचा नसतो. त्याने सरळ दूध विकायचा धंदा सुरू करावा यावर या सर्वांचे एकमत होते.

पण प्रेक्षकांचे काय? ज्यांसाठी हा सगळा खटाटोप चाललेला आहे, त्यांना कोणी विचारते आहे का ? मैदानावर जाउन जे लोक मॅच पाहतात, ते खरे प्रेक्षक .. घरी बसू, आपल्या आरामखुर्चित बसून जे मॅच पाहतात, ते तर टी. व्ही. चा पडदा बघणारे लोक. ते खरे क्रिकेटचे रसास्वादी नव्हेत. अशा प्रेक्षकांच काय असतं की त्यांचा संघ हरायला लागला की हे चॅनेल बदलणार. खरा क्रिकेटमधे रस असणारा प्रेक्षक शेवटपर्यंत आपल्या संघाची बाजू सोडणार नाही. संघ हरो वा जिंको.
खरा क्रिकेटप्रेमी, पाऊस, वारा, ऊन, थन्डी आणि इतर गैरसोय हे सगळे सहन करून, मैदानावर जाऊन सामना बघणार.
त्याला मिळणारा आनंद तो खरा. त्याचे मत हे या सगळ्यांनी ऐकायला हवे.