Saturday, August 2, 2008

मैत्री

दोन दिवसांपूर्वीच आमच्या शेजारी रहायला विचार करणार्या एका कुटुम्बाची ओळख झाली.
आमच्या शेजारी एक घर विकायला काढले आहे. त्यांचा विक्री वकील हा आमचा मित्रच. त्यामुळे तो त्यांना आमच्याकडे घेऊन आला. आणि मग त्यांना ज़रा बरे वाटले असावे.
ते साहजिकच आहे. अनोळखी जागेची, कार्याची सगळ्यांनाच ज़रा भीती वाटतेच. धीर धरून उडी मारणारे त्यातल्या त्यात कमीच असतात. आमच्यासारखे . आम्ही म्हटले की आधी रहायला जाऊ आणि मग ओळखी होतीलच. तसे आजूबाजूचे सगळे समवयस्कच आहेत.

नवीन मित्र बनवणे हे फारसे कठीण नाही. आपण इतरांच्या बाबतीत उत्सुकता दाखवली तर त्यांना छान वाटणारच. आपल्याबद्दल कोणी चांगले बोलत असेल तर आपल्याला तो मनुष्य आपला वाटू लागतो.
पण हे लक्ष्यात ठेवायला पाहिजे की मैत्री ही दोन्हीकडून हवी. आपण कधीच कोणाचे जबरदस्ती मित्र होऊ शकत नाही. तसे असेल तर ती एक तडजोड असते.
मला सुरुवातीला आपले मित्र कोण हे कळायला जरा वेळ लागला. पण आता मला हे कळले आहे की वेगवेगळ्या क्रियांकरिता वेगळेच मित्र हवेत. एकाच मित्राकडून आपल्या सगळ्या कार्यांत सहभाग असणे ही अपेक्षा नैसर्गिक नाही.